गडमुडशिंगी विद्या मंदिरचा आदर्श शाळा योजनेत समावेश करा : आ. ऋतुराज पाटील  

0
9

कोल्हापूर  (प्रतिनिधी) :  गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील जिल्हा परिषदेच्या कुमार व कन्या विद्या मंदिर शाळेच्या नूतन इमारतीसाठी  तातडीने निधी दिला जाईल, अशी  ग्वाही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आ. ऋतुराज पाटील यांना दिली.  या शाळेचा समावेश ‘आदर्श शाळा योजने’त करण्याची विनंती आ. पाटील यांनी यावेळी केली.

या शाळेच्या जुन्या झालेल्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी आवश्यक निधीबाबत आ.  पाटील यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मुंबईत भेट घेतली. १९५४ साली बांधकाम झालेल्या या इमारतीच्या निर्लेखनाचा निर्णय झाला आहे. नव्या इमारतीसाठी सर्व सुविधायुक्त विस्तृत आराखडा तयार करण्यात आला असून यासाठी लागणारा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची विनंती आ.  पाटील यांनी यावेळी केली. तसेच या शाळेचा समावेश शासनाच्या आदर्श शाळा योजनेत करण्याची विनंतीही त्यांनी केली. या दोन्ही मागण्यांना शालेय शिक्षणमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

ही शाळा जिल्ह्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेली जिल्हा परिषदेची शाळा आहे. साडेतीन एकर परिसर लाभलेल्या या शाळेत सध्या सुमारे १२०० विद्यार्थी आहेत. ३६ वर्गखोल्या व अन्य सोयीसुविधानुयुक्त ८ खोल्यांची नवी शाळा इमारत प्रस्तावित आहे.  यावेळी विनोद सोनुले उपस्थित होते.