महावितरण ग्राहक मंचच्या नूतन सुनावणी कक्षाचे लोकार्पण

0
171

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वीजग्राहक व महावितरण व्यवस्थापनाच्या संबंधात विश्वासार्हता वाढीस लागण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाची भूमिका महत्वाची आहे. महावितरणच्या मंचाकडूनही ग्राहकांना न्याय देण्याचे कार्य सतत घडत राहावे, असे प्रतिपादन मुख्य अभियंता परेश भागवत यांनी केले. महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळातील कोल्हापूर व रत्नागिरी परिमंडळाच्या ग्राहक तक्रार निवारण मंचच्या नूतन व सुसज्ज सुनावणी कक्षाचे लोकार्पण भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष व सेवानिवृत्त न्यायाधीश रामचंद्र सरदेसाई, मंचाचे सचिव तथा कार्यकारी अभियंता सुधाकर जाधव, ग्राहक प्रतिनिधी सदस्य कमलाकर बुरांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

रामचंद्र सरदेसाई म्हणाले की, वीज ग्राहक व महावितरण यांच्यातील तक्रारी वा वाद न्याय मार्गाने सोडविण्यासाठी स्वतंत्र त्रिस्तरीय तक्रार निवारण यंत्रणा कार्यरत आहे. कोल्हापूर ग्राहक मंचातर्फे ग्राहकांच्या तक्रारी जलद गतीने निकाली काढल्या जातात. गेल्या वर्षभरात मंचाने ८५ प्रकरणी सुनावणी घेऊन ती निकाली काढली आहेत. कोरोना काळातही मंचाने ऑनलाईन सुनावणी घेऊन ५४ प्रकरणे निकाली काढली आहेत.

कार्यक्रमास सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) सुमन पाटील, सहायक महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) स्नेहा पार्टे, कार्यकारी अभियंता प्रशांतकुमार मासाळ, सुनीलकुमार माने, दीपकराव पाटील, विजयकुमार आडके, भूपेंद्र वाघमारे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. सुनावणी कक्ष नूतनीकरण कार्यासाठी स्थापत्य विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रवीणकुमार थोरात व सहायक अभियंता विश्वजित कांबळे यांचे कौतुक करण्यात आले.