कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील दिव्यांग, मतिमंद, गतिमंद, कर्णबधीर अशा शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांकडून खऱ्या अर्थाने ईश्वर सेवेचे काम केले जाते, असे गौरवोद्गार जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी काढले. इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित स्वयंम मतिमंद मुलांच्या शाळेत शीघ्र निदान व उपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

सातपुते म्हणाले, विशेष मुलांना उत्तम प्रकारे प्रशिक्षण देण्याचे काम जिल्हा परिषदेच्या या शाळांमधून होत आहे. याच प्रशिक्षणाच्या जोरावर ही मुले अनेक ठिकाणी नोकऱ्याही करत आहेत. पंखाविना भरारी आणि जिद्द काय असते ते या मुलांनी दाखवून दिले आहे.

जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे म्हणाले, विशेष मुलांना स्वयंपूर्ण बनविण्याच्या दृष्टिने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून होणारे काम हे प्रेरणादायी आहे. या मुलांनी बनवलेल्या वस्तू निश्चितच गौरवास पात्र आहेत आणि अशा मुलांना प्रशिक्षण देणारे शिक्षक कर्मचारी हे देखील सन्माननीय ठरत आहेत.

स्वयम उद्योग केंद्राच्या अध्यक्ष शोभा तावडे यांचे भाषण झाले. स्वयम मतिमंद मुलांच्या शाळेचे अध्यक्ष राजूभाई जोशी, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष अमरदिप पाटील, श्रीनिवास मालू, खजानिस महेंद्र परमाळ, सदस्य कुलदीप कामत, मनीष देशपांडे, वकील सुलक्ष्मी पाटील, मुख्याध्यापक प्रमोद भिसे आदींसह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.