कोल्हापूर(प्रतिनिधी) : कोल्हापुरात आर्ट फाऊंडेशनच्यातर्फे बालिका दिनानिमित्त बाल चित्रकारांनी काढलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आज (रविवार) पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ही कला कोल्हापूरपुरती मर्यादित न राहता संपूर्ण देशभर, जगभर पोहचावी याचसाठी कोल्हापूर आर्ट फाऊंडेशनची स्थापना केली असल्याचे सांगण्यात आले.

लॉकडाउनच्या काळामध्ये शाळा बंदच्या सुट्टीत कोल्हापूरच्या प्रायव्हेट हायस्कूलची विद्यार्थी कुमारी स्नेहा नागेश हंकारे (इयत्ता आठवी) आणि तिचा भाऊ सोहन हंकारे (इयत्ता तिसरी) यांनी काढलेल्या निसर्ग चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री म्हणाले की, या दोन चिमुकल्यांनी काढलेल्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करताना मला आनंद झाला. कोल्हापूरच्या कलानगरीची कलेची परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी या लहानग्यांचे हात तयार होत आहेत. ही निसर्गचित्रे अत्यंत मनमोहक आणि सुंदर होती. या चित्रांमधील एक निसर्गचित्र मी विकत घेतले आणि आता ते मी मंत्रालयातील माझ्या कार्यालयामध्ये लावणार आहे. आपण सर्वांनीही या प्रदर्शनाला भेट देऊन या चिमुकल्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले.

यावेळी, कलादिग्दर्शक चंद्रकांत जोशी, शिक्षणाधिकारी किरण लोहार, प्राचार्य अजय दळवी, प्रशांत जाधव, विजय टिपुगडे, मुख्याध्यापक माधव गोरे, वसंतराव मुळीक, प्रवीण केसरकर, राहुल बुधले, डॉक्टर मिलिंद सामानगडकर, दादा लाड, आंतरभारती शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष पल्लवीताई कोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.