उत्तराखंडमध्ये लग्नात दारु पार्टी न ठेवलेल्या नवरीला मिळणार १० हजार रुपये

0
94

उत्तराखंड (वृत्तसंस्था) : लग्न सोहळ्यामध्ये मजा मस्तीसाठी आजकाल दारु पार्ट्यांचे आयोजन केलं जातं. यामुळे लग्नसोहळ्यात भांडणं, मारामारी यासारख्या घटना घडतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी उत्तराखंडमधील देवप्रयाग पोलिसांनी खास पुढाकार घेतला आहे. पोलिस प्रशासनानं खासगीरित्या या योजनेला ‘भुली कन्यादान योजना’ असं नाव दिलं आहे. या योजनेअंतर्गत जी मुलगी आपल्या लग्नामध्ये कॉकटेल पार्टीला विरोध करेल त्या मुलीला देवप्रयाग पोलिसांकडून १० रुपयांची रक्कम भुली कन्यादानाच्या रुपाने पुरस्कार म्हणून दिली जाणार आहे.

दारुच्या नशेमध्ये होणारी भांडणं आणि गुन्हेगारी घटना रोखणं हे या योजनेचं खास उद्दिष्ट आहे. देवप्रयाग पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे पुरस्काराची रक्कम पोलिस कर्मचारी आपल्या पगारामधून एकत्रीत जमा करणार आहेत. देवप्रयाग पोलिस ठाण्याचे अधिकारी महिपालसिंह रावत यांनी पुढाकार घेत ही योजना सुरू केली आहे. ग्रामस्थांनीही यासाठी सहमती दर्शवली असल्याचं सांगण्यात आलं आहे.

गेल्या वर्षी राज्यातील चमोलीच्या थराली ब्लॉक आणि पिथोरागडच्या दिहीहाट डिव्हिजनमधील महिलांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी पुढाकार घेतला होता. दारुमुळे गावातील तरुणांमध्ये गैरवर्तनाच्या घटना वाढल्या होत्या हे लक्षात घेता त्यांनी दारु बंदीसाठी मोहीम सुरू केली होती. राज्यातील इतर ठिकाणी देखील अशाच प्रकारच्या दारुविरोधी मोहीमा राबवल्या जात आहेत.