तिसंगीमध्ये महावितरण कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून केला वीज पुरवठा सुरळीत…

0
172

साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यात मुसळधार पावसाने लाईटचे डीपी पाण्याखाली गेले असून विजेच्या तारा तुटून पडल्या आहेत. अशा परिस्थितीत तिसंगी परिसरामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून  गावाला प्रकाश देण्याचे काम तिसंगी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केले.

महावितरण शाखा कार्यालय तिसंगी निवडे सब स्टेशनमधून तिसंगी व्हिलेज फिडर आलेला आहे. त्याचा निवडे,साळवण,मार्गेवाडी,मंदुर, वेतवडे, बालेवाडी या गावांना वीज पुरवठा होतो. या फिडरवरील वेतवडे फाटा येथिल एबी स्विचवरील पोस्ट इंसुलेटर मध्यरात्री खराब झाला. पूर परिस्थितीमध्ये  गावांचा वीजपुरवठा खंडित होऊन मोबाईल नेटवर्क बंद पडले. या कर्मचाऱ्यांना त्यामुळे बोट मिळू शकली नाही. पण काम करण्यासाठी पाचशे फूट लांब पुराच्या पाण्यात पोहत जाऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम महावितरणचे कर्मचारी अमोल मोरे,  महेश मोरे, रवींद्र मार्गे, शरद पाटील, आनंद पडवळ, महेश जाधव यांनी केले.