कोल्हापूर (प्रतिनिधी) : गांधीनगर शहरातील वाहतुकीची कोंडी, पोलीस ठाण्यात फिर्याद घेण्यास टाळाटाळ अशा तक्रारींचा पाढा गांधीनगर पोलीस ठाण्याच्या आढावा बैठकीत विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह व्यापाऱ्यांनी  उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्यासमोर वाचला. जनतेच्या सहकार्याने वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आर. आर. पाटील यांनी दिले.

या बैठकीत वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी मुख्य रस्त्यावर बॅरिकेट्सचा वापर करणे गरजेचे आहे, असे मत होलसेल व्यापारी शंकर दुल्हानी यांनी मांडले. होलसेल व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोक तेहल्ल्यानी म्हणाले की लहान मुले दुचाकीवरून बिनधास्तपणे ये-जा करत असतात, याकडे पोलिसांनी लक्ष द्यायला हवे. गांधीनगर गुड्स मोटर मालक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून व्यापारी वर्गाने माल लोडिंग व अनलोडिंगच्या वेळा निश्चित कराव्यात. त्यातून सायंकाळी होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीवर मात करता येईल. सिंधी सेंट्रल पंचायतीचे नूतन अध्यक्ष गुवालदास कट्यार म्हणाले की, फिर्यादी दाखल करून घेण्यास पोलीस टाळाटाळ करतात. वाढत्या चोर्‍या रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे कायमस्वरूपी सुरू असावेत, अशी सूचनाही काहीजणांनी मांडली.#

विविध संस्था पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीचा आढावा घेताना उपअधीक्षक अधिकारी पाटील म्हणाले की व्यापारी असोसिएशन, ग्रामपंचायत व जनतेच्या सहकार्यातून वाहतूक सुरळीत करू. कोल्हापूर शहरामध्ये तसा प्रयोग मी यशस्वी केला आहे. अन्य प्रश्नांबाबत लक्ष घालण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर व पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम यांनी तक्रारींबाबत उत्तर देण्याचा प्रयत्न केला. होलसेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष पप्पू आहुजा, सरपंच रितू लालवाणी,  अविनाश शिंदे, सतीश माळगी यांनीही मते मांडली. दिलीप कुकरेजा, रमेश वाच्छानी, आयुब जमादार, गोपाल निरंकारी व संतोष तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.