कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील राजाराम साखर कारखान्याची वार्षिक सभेत दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे. ठराव मांडत असताना दोन्ही गटांकडून घोषणाबाजी करण्यात आली. राजाराम कारखान्याच्या कार्यस्थळावर झालेल्या या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले होते. यावेळी दोन्ही गटांचे सभासद आमनेसामने आल्याने तणावपूर्ण वातावरण बनले होते. सभेच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

राजाराम कारखान्यावर गेल्या २८ वर्षांपासून माजी आमदार महादेवराव महाडिक गटाची सत्ता आहे. या कारखान्याच्या वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर आ. सतेज पाटील यांनी कसबा बावडा येथे सभासदांचा मेळावा घेऊन टीका करताना राजाराम कारखान्याच्या सात-बारावर अमल महाडिक यांचे नाव लागेल, असा आरोप केला होता. यावर महाडिक यांनीही आक्रमकपणे पलटवार करून, ‘राजाराम’च्या सातबारावर नाव लावायला मी काही सतेज पाटील नाही, असे प्रत्युतर दिले होते. दुसरीकडे राजाराम साखर कारखान्याचे बोगस व कार्यक्षेत्राबाहेरील १३४६ सभासदांना अपात्र ठरवण्यात आल्याने सत्ताधारी महादेवराव महाडिक गटाला मोठा झटका बसला आहे.

बोगस व कारखाना कार्यक्षेत्रा बाहेरच्या १३४६ सभासदांना प्रादेशिक सहसंचालक आणि माजी सहकार, पणनमंत्री यांनी अपात्र ठरविले होते. त्या १३४६ सभासदांच्या अपात्रतेवर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने महाडिक सत्तारुढ गटाला धक्का बसला आहे. या निर्णयाचा सतेज पाटील यांच्या नेतृत्वातील राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीने याबाबत पाठपुरावा  करण्यात आला होता. सभासदांबाबत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीकडून एकूण १ हजार ८९९ हरकती दाखल केल्या होत्या. याबाबतची सुनावणी कोल्हापूरच्या प्रादेशिक सहसंचालकांनी घेऊन ४८४ सभासद पात्र ठरविले होते. यापैकी मृत व दुबार असे ६९ वगळून अपात्र १००८ व कार्य क्षेत्राबाहेरील ३३८ अशा १३४६ सभासदांना प्रादेशिक सहसंचालकांनी अपात्र ठरविले होते.