कोल्हापूर (प्रतिनिधी) : धरणक्षेत्र वगळता सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला सर्वाधिक पावसाचा फटका बसतो. संभाव्य पूरस्थितीबाबत अधिकाऱ्यांनी धरणातील उपलब्ध पाण्याचे आणि पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच पूरस्थितीत आघाडीवर कार्यरत रहावे, अशा सुचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केल्या.

ना. जयंत पाटील म्हणाले की, या नैसर्गिक आपत्तीचा तिन्ही जिल्ह्यांना प्रचंड फटका बसतो. तो बसू नये याची दक्षता आत्तापासूनच घ्यायला हवी. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून आगामी चार महिन्यात टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्याचे नियोजन सुरु आहे. पुढील काही दिवसात कर्नाटक राज्यातील जलसंपदा मंत्री आणि प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचा विचार आहे. शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियाजन करुन उर्वरित पाणीसाठा कसा कमी करता येईल याबाबत जलसंपदा विभागाने नियोजन करावे. जेणेकरुन पूर परिस्थिती उद्भवणार नाही. याची दक्षता घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे असेही ना. पाटील म्हणाले.

तसेच जिल्ह्यात धरणात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे आवश्यक नियोजन करावे व अनावश्यक पाणी टप्याटप्याने सोडण्यात यावे. कारण पावसाळी स्थितीत जिल्ह्यातील धरणात २५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक राहिल्यास कोल्हापूर जिल्ह्याला पूराचा धोका उद्भवू शकतो अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

या बैठकीसाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खा. संजय मंडलीक, आ. राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. कांदबरी बलकवडे, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे उपस्थित होते.