कोल्हापूर (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्‍यात पुरामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. भरपाईसाठी परिपूर्ण प्रस्ताव सर्व यंत्रणांनी आपल्या विभागाकडे तातडीने पाठवावेत. मदतीपासून कोणीही वंचित राहू नये, याची दक्षता यंत्रणांनी घ्यावी. पुढील काळात पुरामुळे किंवा दरड कोसळणे, रस्ता खचणे यासारख्या गोष्टी घडू नयेत, यासाठी तालुक्याचा मास्टरप्लॅन तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या. तालुक्यात पूर व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आज (शनिवार) पंचायत समितीमध्ये झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

महसूल आणि विशेषत: कृषी विभागाने १५  ऑगस्टपूर्वी पंचनाम्याचे काम पूर्ण करावे. पुरामुळे पिकांचे झालेले नुकसान, दरड कोसळून माती पडल्याने झालेले नुकसान, खरवडून गेलेली शेती अशी वर्गवारी करून पंचनामे करावेत. ज्या ठिकाणी धोका जादा आहे, तेथील १०० टक्के पुनवर्सन करण्यासाठी प्राधान्य द्यावे. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जागेची पाहणी करून त्याचा सविस्तर आराखडा तयार करावा. ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे, त्यांची तत्काळ  तात्पुरत्या निवासस्थानाची सोय करावी. अंगणवाडी, ग्रामपंचायत इमारती व शाळांची झालेली पडझड याची माहिती घेऊन या संदर्भातील पंचनामे लवकर पूर्ण करण्यात यावेत. मागील काही वर्षातील आलेला पूर, झालेले नुकसान यांचा सविस्तर अभ्यास करून एसओपी तयार करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

तहसिलदार संगमेश कोडे यांनी गगनबावडा तालुक्यात झालेल्या नुकसानीची माहिती दिली. पूर व अतिवृष्टीमुळे साळवण व गगनबावडा ४२ मंडलातील ३३७ कुटुंबातील १५३२ लोकांचे तर ४४७ जनावरांचे स्थलांतर केल्याचे सांगितले. बैठकीस सभापती संगीता पाटील, प्रांताधिकारी वैभव नावडकर, गटविकास अधिकारी माधुरी परीट, गगनबावडा ठाण्याचे स. पो. नि. रणजित पाटील, सा. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय काटकर, जि. प. माजी अध्यक्ष बजरंग पाटील, उपसभापती पांडुरंग भोसले आदी उपस्थित होते.