मुंबई (प्रतिनिधी) : वयाच्या चौदाव्या वर्षी नववीत असताना मी अन्वय नाईक यांच्या प्रेमात पडले. आज करवाचौथला त्याचे फळ मिळाले, अशा भावना अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केल्या. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक या मायलेकींनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, गाडीवर दोन बाटल्या फेकून मारल्या, तर त्रास होतो. माझ्या घरातील दोन प्रियजन गेले आहेत. नववीत असताना मी अन्वय नाईक यांच्या प्रेमात पडले. वयाच्या चौदाव्या वर्षी. माझा जीव तुटणार नाही का? आज करवाचौथ आहे, हे (गोस्वामींची अटक) त्याचेच फळ आहे. माझ्या नवऱ्याने सुसाईड नोटमध्ये तिघांची नावे लिहिली होती, पण त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नव्हती. आज महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई केली. मी त्यांची शतश: आभारी आहे.

अर्णव गोस्वामींसारखी माणसे काम करुन घेतात आणि पैसे देत नाहीत. अर्णव यांनी सूडबुद्धीने हे सर्व केले आहे. माझ्या पतीला पैसे मिळाले असते तर ते जिवंत असते. ८३ लाख रुपये देय आहेत. फिरोजकडून चार कोटी, इतरांकडून येणे होते. पण तेही देऊ नका, असे अर्णवने सांगितले होते.

आम्ही जगायचे नाही का, फक्त अर्णव गोस्वामीला जगायचा अधिकार आहे का? पत्रकारिता अशी असते का? आमचे फोन टॅप केले होते, आम्ही संजय बर्वे, सुरेश वऱ्हाडे यांनाही भेटलो होतो. अर्णव गोस्वामींना अटक झाली हे खूप चांगले झाले. त्या तिघांची नावे सुसाईड नोटमध्ये लिहिली आहेत. त्यांना यापूर्वीच अटक व्हायला हवी होती. मात्र का झाली नाही, मला माहिती नाही.