सिंधुदूर्ग किल्ल्यावर ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सव उत्साहात

0
52

सिंधुदूर्ग (प्रतिनिधी) : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छ. शिवाजी महाराज आणि या शिवप्रभूंची शिवलंका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधूदूर्ग किल्ल्यावर रविवारी  ऐतिहासिक परंपरेनुसार समुद्राला सोन्याचा नारळ  अर्पण करून  नारळी पौर्णिमा  साजरी करण्यात आली. 

समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा छ. शिवाजी महाराजांनी सिंधुदूर्ग किल्ल्यावर सुरू केली होती.  आजच्या धकाधकीच्या जीवनात किल्ल्यावरील रहिवाशांनी तेवढ्याच उत्साहाने आणि अभिमानाने ती पुढे सुरू ठेवली आहे. शिवकाळात सिंधुदूर्ग किल्ल्यावरून समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण केल्यावर तोफांची सलामी दिली जायची. किल्ल्यावरून डागलेल्या तोफांचा आवाज आला की मगच मालवण पंचक्रोशीतील लोक समुद्राला नारळ अर्पण करायचे.

आजच्या काळात किल्ल्यावरच्या तोफा बंद स्थितीत आहेत. त्यामुळे तोफांची जागा फटाक्यांनी घेतली  आहे.  समुद्राला नारळ अर्पण करून किल्ला रहिवाशांकडून किल्ल्यावर फटाके फोडले जातात. किल्ल्यावरून फटाक्यांचा आवाज आला की मगच मालवण पंचक्रोशीतील व्यापारी आणि बाकी मालवणवासीय समुद्राला नारळ अर्पण करतात.  शिवाजी महाराजांनी १७  व्या शतकात सुरू केलेली ही प्रथा किल्ला रहिवाशांकडून आणि मालवण पंचक्रोशीतील लोकांकडून आजही जपली जातेय.