शिवडाव, कोंडोशी परिसरात ‘टस्कर’मुळे उस, फणसाचे मोठे नुकसान : शेतकरी त्रस्त

0
150

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्याच्या शिवडाव, अंतुर्ली, कोंडोशी परिसरात टस्कर हत्तीने सलग दहा दिवसांपासून मुक्काम ठोकला असून कोंडोशी व शिवडाव येथील ऊस पिकाचे रात्री नुकसान करून दिवसा हा हत्ती जंगलात निघून जात आहे. कडगांव वनक्षेत्रपाल बी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने शेतकऱ्यांची नुकसानभरपाई व हत्तीचे संरक्षण अशी दुहेरी यंत्रणा उभी केली आहे. गावोगावी गस्त घालण्याचे काम सुरू असून रात्री कोणीही शेतात मुक्कामाला न जाण्याच्या सूचना वन विभागाने केल्या आहेत. हत्ती उसाचे नुकसान करून फणसही फस्त करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

वनक्षेत्रपाल बी. एस. पाटील यांनी सांगितले की, केवळ फणस खाण्यासाठीच या हत्तीने या परिसरात मुक्काम वाढवला आहे. पिकलेले फणस खाण्यात हा हत्ती गुंतला आहे. दिवसाला दहा ते बारा फणस हा हत्ती फस्त करत आहे. गेल्या वेळी याच हत्तीने वाकीघोलात उतरून एका इसमास जागीच ठार केले होते. या हत्तीस या परिसरातल्या पश्चिम घाटमाथ्याच्या जंगलाचा परिपूर्ण अभ्यास आहे.

परवा या हत्तीने कोंडोशी परिसरातील ऊस पिकाचे तर काल रात्री शिवडाव येथील कांबळे यांच्या शेतातील ऊस पिकांचे नुकसान केले आहे. या हत्तीने ऊस, फणस पिकांचा फडशा पाडावयास सुरु केल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.