पट्टणकोडोलीत कृत्रिम पद्धतीने अंडी उबवून सापाच्या ६ पिल्लांना दिला जन्म

0
165

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तस्कर जातीच्या बिनविषारी सापाची ६ अंडी योग्य तापमानात कृत्रिम पद्धतीने उबविण्याचा प्रयोग पट्टणकोडोलीत यशस्वी ठरला आहे. या अंड्यातून साधारण ३३ दिवसानंतर सापाच्या ६ पिल्लांचा जन्म झाला. ही सर्व पिल्ले सुखरूप असून त्यांना निसर्गात मुक्त वातावरणात सोडून देण्यात आली आहेत.

वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे प्राणी मित्र पप्पू खोत यांना पट्टणकोडोली येथील बंधुबाई मंदिर परिसरात तस्कर जातीच्या बिनविषारी सापाची ६ अंडी उघड्यावर पडलेल्या अवस्थेत आढळली. त्यांनी ती अंडी ताब्यात घेऊन वनविभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर, वनपाल घनश्याम भोसले,  वनरक्षक सागर यादव यांना याबाबतची माहिती दिली.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती अंडी कृत्रिम पद्धतीने उबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तस्कर सापाची अंडी रबरासारखी मऊ कवचाची व लांबट असतात. त्यांना योग्य तापमानासोबत आर्दता द्यावी लागते. माती, पालापाचोळा, व कोकोपीठाचा वापर करुन कृत्रिम नैसर्गिक अधिवास तयार करून त्यात अंडी सेट केली. त्यानंतर साधारणता ३३ दिवसात ६ पिल्लांचा सुखरूप जन्म झाला. तस्कर सापांच्या पिल्लांची जन्मताच लांबी ११ ते १२ इंचापर्यंत होती. त्यांची लहानपणापासून शिकार करून निसर्गात राहण्याची क्षमता असल्याने पिल्लांना नैसर्गिक अधिवासात तत्काळ मुक्त करण्यात आले.