कोतोली (प्रतिनिधी) : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पन्हाळा तालुक्यात निवडणूक आयोगाने स्थापन केलेल्या प्रभाग आरक्षणावर तालुक्यातून सहा हरकती दाखल करण्यात आल्या होत्या; मात्र या सर्व हरकती विभागीय आयुक्तांनी फेटाळून लावत निवडणूक आयोगाने स्थापन केलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रभाग आरक्षण कायम ठेवले.

पूर्वी असणाऱ्या पाच जि. प. मतदारसंघात नवीन दोन मतदार संघ, तर पं. स.चे दहा गण होते. त्याला आता नवीन चार गणांची भर पडली आहे. लोकसंख्येच्या आधारावर तालुक्यातील निवडणूक आयोगाच्या आदेशाने महसूल विभागाने प्रभाग रचना तयार केली होती. यावर माले, यवलूज, पोर्ले तर्फे ठाणे, कोतोली, बाजार-भोगाव, कळे, वेतवडे, सातवे, वाघवे इत्यादी गावातील नागरिकांनी सहा तक्रारी विभागीय आयुक्त यांच्याकडे केल्या होत्या. त्या फेटाळून लावल्या असल्याचे सांगितले. तसेच रमेश शेंडगे यांनी जाहीर केले.

कळे, पुनाळ, पोर्ले तर्फे ठाणे कोतोली, वाडी रत्नागिरी, सातवे व कोडोली असे सात जिल्हा परिषद मतदारसंघ असून, पंचायत समितीसाठी वेतवडे, कळे, बाजार-भोगाव पुनाळ, यवलूज, पोर्ले तर्फे ठाणे, कोतोली, वाघवे, माले,सातवे, कोडोली पूर्व, कोडोली पश्चिम व वाडी रत्नागिरी असे एकूण १४ गण आहेत.