पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीसाठी मार्गशीर्ष गुरुवारचा मुहूर्त साधत सदस्य पदासाठी ३८२ तर सरपंच पदासाठी ६७ असे एकूण ४४९ इतके विक्रमी अर्ज दाखल झाले. अशी माहिती तहसीलदार रमेश शेंडगे यांनी दिली.

अर्ज भरण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती. ती सायंकाळी सात वाजेपर्यंत उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. सर्वात जास्त यवलूजमधून ३७ अर्ज सदस्य आणि सरपंच पदासाठी दाखल झाले आहेत. त्यानंतर सुमारे सतरा गावातून मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. उद्या (शुक्रवार) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. तर ऑफलाईन अर्ज भरता येणार असून ते सायंकाळी ५.३० पर्यंत दाखल करता येणार आहेत.