शिरोळ (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस रुग्णांवर उपचार करीत आहेत. परंतु, शिरोळ तालुक्यातील कोंडिग्रे गावामध्ये आज (मंगळवार) अजब प्रकार घडला. कोंङिग्रे गावातील शाहूनगर भागामध्ये रुग्णांची संख्या दहाच्या वर गेली आहे. मात्र, येथील प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे एक कोरोना रुग्णाने चक्क ग्रामपंचायतीकडे धाव घेत तो तिथे जाऊन बसला.

या रुग्णाचा २९ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्याला कोरोनाची लक्षणे जाणवत असल्यामुळे त्याने स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले होते. परंतु, ग्रामपंचायतीने या रुग्णावर कोणताही उपचार नाही, तसेच गावामध्ये तो रहात असलेल्या भागात औषधाची फवारणी देखील केली नाही. इथल्या नागरिकांनी वारंवार सांगून देखील ग्रा.पं.ने कोणतीच भूमिका न घेतल्याने हा रुग्ण चक्क ग्रामपंचायतीमध्ये जाऊन बसला.

जो पर्यंत गावामध्ये औषध फवारणी होत नाही, माझ्या उपचार होत नाहीत, तोपर्यंत मी येथून जाणार नाही. अशी भूमिका त्याने घेतली. यावेळी कोंडिग्रेचे सरपंच, उपसरपंच,पोलीस पाटील ग्रामपंचायती समोर दाखल होताच नागरिकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी सरपंच आणि उपसरपंचांनी या रुग्णावर उपचार करु तसेच परिसरात औषधाची फवारणी करु असे आश्वासन दिले.