कोल्हापूर : येथील आरोग्य उपसंचालक यांच्या कार्यालयात ५ हजार रुपयांची लाच घेताना मुख्य प्रशासकीय अधिकारी भावना चौधरी यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमासाठी ऑफिसमध्ये नटून थटून आलेल्या आरोग्य उपसंचालक भावना चौधरी या तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या ताब्यात अलगद सापडल्या. ही कारवाई झाल्यानंतर भावना चौधरी यांच्यावर तोंड लपवण्याची वेळ आली.

आरोग्य उपसंचालक कार्यालयात मुख्य प्रशासकीय अधिकारी असलेल्या भावना चौधरी यांनी भविष्य निर्वाह निधीतील रकमेपैकी ९० टक्के रकमेतील ६ लाख ७२ हजार रुपये मंजूर करण्यासाठी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. १० टक्के म्हणजेच ६ हजार ७०० रुपयांची लाच तक्रारदार यांच्याकडे मागणी केली होती. अखेर ५ हजार रुपये देण्यावर तडजोड झाली. त्यामुळे तक्रारदाराने अॅन्टी करप्शन ब्युरोकडे मुख्य प्रशासकीय अधिकारी भावना सुरेश चौधरी यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.

तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनंतर लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता भावना चौधरी यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे कार्यालयात सापळा लावला असता भावना चौधरी ह्या तक्रारदाराकडून ५ हजारांची लाच घेताना अलगद सापडल्या. तक्रारदार हे पुढील वर्षी सेवानिवृत्त होणार असल्याने रक्कम मंजुरीसाठी प्रक्रिया सुरु केली होती. भावना गवळी यांच्या अखत्यारित कोल्हापूरसह सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा कार्यभार आहे.

ही कारवाई राजेश बनसोडे, (पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक, अॅन्टी करपान ब्युरो, पुणे), सूरज गुरव, (अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरचे आदिनाथ बुधवंत (पोलीस उपअधीक्षक), पो.हे.कॉ शरद पोरे, कॉ. मयूर देसाई, रूपेश माने, संदीप पडवळ व महिला कॉ. छाया पाटोळे यांनी केली.