सावरवाडी ( प्रतिनिधी ) : करवीर तालुक्यात ऊस पीकांच्या लागणीसाठी विविध संकरीत ऊस बियाणांच्या वापर करून लागणी केल्या जात आहेत. मात्र, यंदा ऊस लागणीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून एक डोळा पध्दत लागणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

शेतामध्ये  बैलांचे  औत, ट्रॅक्टर, रोटावेटर यांच्या माध्यमातून नांगरटी करून चार फुटाच्या अंतराने सरी काढल्या जात आहेत. पाण्याच्या पाळ्याबरोबरच एक डोळा पध्दत ऊस लागणी केली जाते. साधारणत: दोन फुटांच्या अंतराने ऊसाचे डोळे लावले जातात.

यामध्ये सुधारित को. ८६०३२,  ७५२७, ९२००५, २६५ यासारख्या ऊसांची बीयाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडू लागली आहे. या एक डोळा ऊस लागणीतून शेतकऱ्यांना जादा ऊसाचे उत्पन्न मिळते म्हणून एक डोळा पध्दत ऊस लागणी सर्वत्र सुरु झाल्या आहेत.