कर्जत तालुक्यात तिन्ही ग्रा.पं.मध्ये रोहित पवारांना धोबीपछाड

0
17

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवारांना राम शिंदेंनी धोबीपछाड दिली आहे. कर्जत तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायती राम शिंदे गटाकडे गेल्या आहेत.विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा भाजप आमदार राम शिंदे या ना त्या प्रकाराने काढताना दिसत असतात. राज्यात सत्तापरिवर्तन होताच ग्रा.पंचायत निवडणुकांच्या निकालातही राम शिंदेंनी राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणातही त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. कर्जत तालुक्यातील तिन्ही ग्रा.पं.वर राम शिंदे यांच्या गटाने वर्चस्व मिळवले आहे. या ग्रा.पं. रोहित पवारांच्या विधानसभा मतदारसंघात येत असल्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. नुकतेच भाजपने राम शिंदे यांना विधानपरिषदेवर पाठवून त्यांचे बाहू मजबूत केले आहेत. त्याचा परिणामही लगेच पाहायला मिळत आहे.

आज राज्याच्या १५ जिल्ह्यातील २३८ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. नाशिक जिल्ह्यातील ३६, धुळे ४१, जळगाव २०, अहमदनगर १३, पुणे १७ सोलापूर २५, सातारा ७, सांगली १, औरंगाबाद १६, बीड १३ परभणी २, उस्मानाबाद ९, जालना २७, लातूर ६ आणि बुलडाणा जिल्ह्यातील ५ अशा एकूण २३८ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागत आहे. दरम्यान, या निवडणुकांसाठी सरासरी ७८ टक्के एवढे मतदान झाले होते.