जालना :  जालन्यामध्ये प्राप्तिकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यामध्ये लोखंडी गज उत्पादित करणाऱ्या स्टील कारखानदरांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली. यामध्ये तब्बल ३९० कोटींचे घबाड जप्त केले आहे. स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घरावर आणि कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला.

आयकर विभागाने एसआरजे पीटी स्टील्स आणि कालिका स्टील अलॉयज कंपन्यांवर छापे टाकले. या छाप्यात आयकर विभागाला तब्बल ३९० कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. छापा टाकण्यात आलेले व्यावसायिक बऱ्याच दिवसांपासून आयकर विभागाच्या रडारवर होते. त्यामुळे ठोस माहितीनंतर आयकर विभागाच्या सुमारे ४०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी या व्यावसायिकाच्या अनेक ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात अनेक महत्त्वाची कागदपत्रे, सोने आणि रोख रक्कम सापडली आहे.

प्राप्तिकर विभागाने केलेल्या या छापेमारीमध्ये ५८ कोटींची रोख रक्कम तसेच ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे असा ऐवज जप्त आहे. यासोबतच ३०० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेची कागदपत्रे देखील प्राप्तिकर विभागाच्या हाती लागली आहेत. या कारवाईमध्ये प्राप्तिकर विभागाने जप्त केलेले पैसे मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना जवळपास १३ तास लागले. या कारवाईमध्ये औरंगाबादमधील एका प्रसिद्ध लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे.