शिरोळ (प्रतिनिधी) : जयसिंगपूर शहरातील डॉ. सतिश पाटील यांचे पायोस हॉस्पिटल गावठी बाँम्बने उडवून देण्याचा कट जयसिंगपूर पोलिसांनी उधळून लावला. ही घटना आज (रविवारी) दुपारी अडीच्या सुमारास घडली. जयसिंगपूर पोलिस व कोल्हापूर बॉम्ब शोध व नाशक पथकाच्या अथक प्रयत्नानंतर गावठी बॉम्ब निकामी केल्यानंतर पोलिसांसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.  

याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सांगली- कोल्हापूर रस्त्यावर डॉ. सतिश पाटील यांचे पायोस हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या कंपाऊड लगत गुरूवारपासून बेवारस अवस्थेत प्लॉस्टिकच्या पोत्यामध्ये काही साहित्य पडून होते. मात्र, सिक्यूरिटी गार्डने सदरचे साहित्य पेशंटच्या नातेवाईकांचे असेल, म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले होते.

आज सकाळी हॉस्पिटमधील भरत पाटील या कर्मचार्‍याला या साहित्यातून टिक-टिक असा आवाज आला. त्यामुळे त्याने तपासून पाहिले असता आतमध्ये प्लॉस्टिकच्या पाईप, वायर, आणि इलेक्ट्रॉनिक सर्किटसारखे साहित्य आढळून आले. तर या पोत्यामधून लांब अंतरापर्यंत एक केबल पडलेली लक्षात आली. याबाबतची माहिती पाटील यांनी तत्काळ डॉ. सतिश पाटील यांना दिली. त्यांनी याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगड्डे यांना कळविले. काही वेळातच कोल्हापूरहून बॉम्ब शोध व नाशक पथक, ठसे तज्ञ, श्वान पथक असा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

डीवायएसपी रामेश्वर वैजणे यांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्ब शोध व नाश पथकातील हेड कॉन्स्टेबल मानसिंग पाटील, विनायक लाटणे, मुस्ताक शेख, पोलीस नाईक जयंत पाटील, अशीष मिठारे, जीवन कांबळे, रवी पाटील, विनायक डोंगरे, ‘मर्फी’ श्वान यांनी सुमारे १ तासाच्या अथक प्रयत्नानंतर हा गावठी बाँम्ब निकामी केला. पुढील तपासाकरीता घटनास्थळावरील साहित्य ताब्यात घेतला आहे.

या पथकात पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगीड्डे, पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलीस नाईक गुलाब सनदी, अभिजित भातमारे, अमोल अवघडे, रोहीत डावाळे आदींनी सहभाग घेतला.