इचकरंजीमध्ये नागरीकांनी ठोकले विद्युत विभागाला टाळे…

0
64

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीमधील प्रभाग क्रमांक दहा येथील फकिरमळा, कोलेमळा परिसरातील वीजेचे खांब उभारणीचे काम केले नाही. यासाठी नगरसेवक राजू बोंद्रे आणि भागातील नागरिकांनी विद्युत विभागाला टाळे ठोकत ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत काम सुरु होत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला.

इचलकरंजीमधील प्रभाग क्रमांक दहामध्ये वीजेचे खांब उभारणीचे काम चार वर्षापासून प्रलंबित आहे. कामाची वर्कऑर्डर देऊनही मक्तेदाराकडून कामाची चालढकल केली जात आहे. या संदर्भात तक्रारी करुनही प्रशासनाकडून काहीच कारवाई होत नाही. आठवडाभरापूर्वी नगरसेवक राजू बोंद्रे यांनी मुख्याधिकारी यांना काम सुरु करण्याबाबत पत्र देऊन आठ दिवसात काम सुरु न केल्यास फकिरमळा, कोलेमळा परिसरातील नागरिकांसह विद्युत विभागाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा दिला होता.

मात्र, बोंद्रे यांच्या इशार्‍याकडेही प्रशासनाने सोयीस्करपणे दुर्लक्षच केले. त्यामुळे संतप्त झालेल्या बोंद्रे यांनी नागरिकांसह थेट विद्युत विभागालाच टाळे ठोकले. सुमारे अर्धातास सुरु असलेल्या या आंदोलनानंतर उपमुख्याधिकारी केतन गुजर यांचेसमवेत झालेल्या चर्चेत येत्या दोन दिवसात प्रलंबित काम सुरु करण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली. त्यावर दोन दिवसात काम सुरु न झाल्यास आपण नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारालाच टाळे ठोकू असा इशारा बोंद्रे यांनी दिला.

या आंदोलनात भारत पोवार, ईलाही मुजावर, मेहबुब शेख, उस्मान जमादार, शाहबाज मुक्केरी, राहुल घोरपडे, शंकर मानकर, हारुण मोमीन, अफजल शिरट्टी, शाहरुख सनदी, कय्युम मुल्ला, सलमान शेख, संतोष काटकर, आशिष कोरवी, इरफान मकानदार, अरुणा जाधव, कविता पाटील, ज्योती गोडसे, अल्लाबी शेख, शहनाज फकिर, नजमा शेख आदींसह नागरिक सहभागी झाले होते.