इचलकरंजी (प्रतिनिधी) : वादग्रस्त शेत जमिनीचा निकाल आपल्या बाजूने लावून देतो, असे सांगून ३ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या एका व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने आज (मंगळवार) दुपारी सापळा रचून रंगेहाथ अटक केली. भिकाजी नामदेव कुराडे (वय ४६, रा. साईनगर, चंदूर, ता. हातकणंगले) अशी अटक केलेल्याचे नांव आहे. ही कारवाई इचलकरंजीतील शिवाजी महाराज पुतळा चौकातील एका हॉटेलजवळ केली.

या प्रकरणात कुराडे यांचा पुत्र सारंग भिकाजी कुराडे (वय ४६, रा. साईनगर, चंदूर, ता. हातकणंगले), इम्रान मुसा शेख ( वय ४१, रा. १०० फुटीरोड, सांगली) यांचाही समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मिळालेली माहिती अशी, तक्रारदार यांची शिरोळ तालुक्यात शेत जमीन असून या  जमिनीच्या मालकीवरून वाद सुरू आहे. प्रांत कार्यालयात तक्रारदार यांच्याविरोधात निकाल लागला आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले. त्यावर सुनावणी सुरू आहे.

दरम्यान, निकाल आपल्याबाजूने लावून देण्यासाठी कुराडे यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ लाखांची मागणी केली. त्यापैकी २ लाख रुपये कुराडे यांनी आधीच घेतले असून  राहिलेली ३ लाखाची रक्कम घेताना कुराडे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अलग अडकले. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल शरद पोरे, नवनाथ कदम, संदीप पडवळ, मयूर देसाई, सुरज आपराध यांच्या पथकाने केली.