कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी सत्तारूढ आणि विरोधी आघाडीने आपल्या पॅनलची घोषणा केली. पण दोन्ही आघाड्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी कामगार पक्ष या दोन्ही शेतकऱ्यांच्या पक्षांना मात्र वाऱ्यावर सोडले. गोकुळ दूध संघात या दोन्ही पक्षांकडे अगदी नगण्य ठरावधारक मतदार असल्याने दोन्ही आघाडीच्या नेत्यांना या पक्षांना प्रतिनिधित्व देण्याची गरज वाटली नसल्याचे चित्र दिसून आले.

गोकुळ दूध संघासाठी निवडणूक लढवणाऱ्या सत्तारूढ आघाडीतील काँग्रेस, भाजप, शिवसेनेसह राजकारण, सहकार, समाजकारणातील काही कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे. तर विरोधी आघाडीने जिल्ह्यातील भाजप वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्य आणि इतर सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील उमेदवारांना संधी दिली आहे. अर्थातच यासाठी ठरावधारक मतदारांचे संख्यात्मक पाठबळ हाच निकष दोन्ही आघाड्यांनी लावला आहे. यामध्ये पॅनल निश्चित करण्यापूर्वी दोन्ही आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खा. राजू शेट्टी यांची भेट घेऊन पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता.

पण शेट्टी यांनी या नेत्यांना ठोस भूमिकेसह सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. या उलट आपला संघर्ष स्वतंत्रपणे करण्याची भूमिका घेतली आणि संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केले. शेट्टी यांना या दोन्ही आघाडीकडून काय अपेक्षा होती हे त्यांनी कधीच स्पष्ट केले नाही आणि निर्णयही दिला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठरावधारक मतदार प्रत्यक्ष किती याचा विचार करूनच त्यांचा नाद सोडून दिला. आणि दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी आपले पॅनल जाहीर केले.

हीच गोष्ट शेतकरी कामगार पक्षाबाबत झाली आहे. शेतकरी संघटनेचे नेते माजी आ. संपतराव पवार पाटील यांच्याशी कोणाच्या प्रत्यक्ष भेटीगाठी झाल्याचे दिसले नाही. फोन आणि इतर माध्यमातून संपर्क साधून चर्चा झाली. पण पाठिंब्याबाबत शे. का. पक्षाची भूमिका स्पष्ट झाली नाही. पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनीही उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले होते. पण त्यांची दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी दखल घेतली नाही आणि शे. का. पक्षाला जमेत न धरता आघाड्यांच्या पॅनलच्या घोषणा झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावाने असलेले दोन्ही पक्ष गोकुळ दूध संघाच्या अनेक प्रकरणात संघर्ष चळवळीत सक्रिय असूनही निवडणुकीत मात्र वाऱ्यावरच राहिले.