गोकुळमध्ये महाडिक, पी एन विरोधात एकवटले सर्व ‘मातब्बर’ नेते…

0
3253

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : कोल्हापुरात गोकुळ निवडणुकीचे वातावरण तापले आहे. विरोधी आघाडीत बघता बघता तीन मंत्री, दोन खासदार, चार आमदार, दोन माजी आमदार आणि एक माजी खासदार एवढ्या मोठ्या प्रमाणात ताकत एकवटली आहे. यामुळे गोकुळच्या निवडणुकीत आता सत्ताधाऱ्यांची काय रणनीती असणार आहे हेच पहावे लागेल.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी ‘आपलं ठरलय’ असा नारा दिला आणि लोकसभेपासून विजयी घौडदौड चालू ठेवली आहे. लोकसभे पाठोपाठ विधानसभा यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीतही महाविकास आघाडीचा दबदबा पाहायला मिळाला. गोकुळ ताब्यात घेतल्याशिवाय शांत बसायचं नाही असा चंगच पालकमंत्री सतेज पाटील यांनी बांधल्याच दिसून येत आहे. यातूनच त्यांनी ‘आपलं ठरलय गोकुळ उरलय’ असा नारा दिला आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी गोकुळमधील एक-एक करत एक दोन नव्हे पाच संचालक फोडले. एवढ्यावरच न थांबता प्रत्येकाला भेटून नेत्यांची मोट बांधली. ती आज इतकी मोठी झाली आहे कि त्यामध्ये ना. हसन मुश्रीफ, ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, विनय कोरे, प्रकाश आबिटकर, ऋतुराज पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके आणि सत्यजित पाटील सरूडकर याचबरोबर माजी खासदार राजू शेट्टी हे नेतेलोक एकवटले आहेत. यात गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, विश्वास नारायण पाटील, जयश्री पाटील-चुयेकर यांचाही समावेश झाला आहे.

वास्तविक यंदाची गोकुळची निवडणूक अटीतटीची होणार हे सर्वांनाच माहीत होत. पण सत्ताधारी गटाला निवडणुकीआधीच इतका मोठा विरोध कदाचित त्यांनीही अपेक्षीत नसेल. विरोधी आघाडी एकीकडे नेते एकत्र करून आपली दावेदारी मजबूत करत असली तरी सत्ताधारी गट मात्र शांत बसून सर्व हालचाली पाहत आहे. याचबरोबर त्यांनी गोकुळमध्ये केलेले काम आणि गोकुळची झालेली प्रगती ते प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन सांगत आहेत. सत्ताधारी गट जरी शांत असला तरी सोशल मिडीयावर त्यांचा प्रचार मात्र ‘गोकुळमध्ये सर्व चांगल चाललयं’ असाच सुरु आहे.

एकीकडे जिल्ह्यातील सर्व राजकीय नेत्यांची भली मोठी फौज तर दुसरीकडे महाडिक आणि पी एन पाटील हे दोन नेते असा लक्षणीय सामना पाहायला मिळणार आहे. गोकुळच्या या रणांगणात सद्यपरिस्थितीत विरोधी आघाडी कागदावर अगदी सक्षम वाटत आहे. पण मागील आठवड्यात जेष्ठ नेते अरुण नरके यांनी ‘गोकुळचा मतदार हुशार आहे त्याला गोकुळचे बरे वाईट चांगले समजते’ असा सुचक इशाराही बरेच काही सांगून जात आहे.

एकंदर गोकुळची निवडणूक जिल्ह्याच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिणार हे नक्की. यातूनच भविष्यातील राजकारणाच्या दिशाही स्पष्ट होतील हे मात्र निश्चित..!