गोव्यात डॉ. प्रमोद सावंत यांचा राजीनामा नवा मुख्यमंत्री कोण?

0
137

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (शनिवारी) राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. त्यांना पुढील सरकारी येईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अकाली निधनानंतर १९ मार्च २०१९ रोजी गोव्याचे तेरावे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी शपथ घेतली होती.

विधानसभेच्या आताच्या निवडणुकीत मुख्यमंत्री डॉ सावंत यांचा चेहरा पुढे करून भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरा गेला होता. ४० पैकी २० जागा जिंकण्यात भाजपला यश आलेले आहे. भाजपमध्ये आता मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, माजी आमदार रोहन खंवटे, माजी मुख्यमंत्री रवी नाईक अशी नावे मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आली आहेत. भाजपचा विधिमंडळ गटनेता ठरवण्यासाठी केंद्रीय संसदीय मंडळाकडून अद्याप निरीक्षक नियुक्त करण्यात आलेला नाही. यामुळे भाजप आपला विधी मंडळ गटनेता अद्याप निवडू शकलेला नाही.

इतर राज्यांमधून शपथविधीच्या तारखा जाहीर होत असतानाच गोव्यातील नव्या सरकारचा शपथविधी कधी याचे उत्तर मात्र शनिवारीही मिळू शकले नाही. याबाबत डॉ सावंत म्हणाले, विधानसभा बरखास्तीचा ठराव मंत्रिमंडळामध्ये संमत करण्यात आला होता तो राज्यपालांकडे सादर केला. नवीन सरकार निवडे सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तो राज्यपालांनी स्वीकारला आणि काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती दिली आहे. राजकीय निरीक्षक राज्यात कधी येतील याची आत्तापर्यंत तरी कल्पना नाही. चार राज्यांमध्ये शपथविधी होणार असल्याने केंद्रीय नेतृत्वाच्या वेळेनुसार याबाबतचे निर्णय होतील.