गारगोटी (प्रतिनिधी) : गारगोटीत गेल्या दिडदोन वर्षांपासून दारात वाळत टाकलेली कपडे आणि इतर साहित्य चोरीला जात होते. मध्यरात्रीच्यावेळी हा विकृत मनोवृत्तीचा चोरटा अनेकांच्या घरातील कपडे चोरत होता. न्यायालय परिसरात आज (सोमवार) पहाटे चोरी करत असताना खुद्द न्यायाधीशांनीच पाळत ठेऊन त्याला रंगेहाथ पकडले.

सुशांत सदाशिव चव्हाण (वय ३५, रा. सोळांकूर, ता. राधानगरी, सध्या रा. सोनाळी-गारगोटी) असे या चोरट्याचे नाव आहे. याची नोंद भुदरगड पोलिसांमध्ये झाली आहे. गारगोटमध्ये गेल्या दिड ते दोन वर्षांपासून अनेकांच्या घराबाहेर वाळत घातलेली कपडे विशेषतः महिलांची चोरीला जात होती. पण ही चोरी किरकोळ कपड्यांची असल्याने त्याबाबत पोलिसांत कोणीच जात नव्हते.

न्यायालय परिसरात अशा घटना घडत असल्याने खुद्द न्यायाधिशांनीच  परिसरात खास सीसीटीव्ही कॅमेरे लावले आणि त्याच्यावर पाळत ठेवली. आज पहाटे पाचच्या सुमारास संरक्षक भिंतीवरून उडी मारून हा चोरटा पुन्हा न्यायालय परिसरात चोरी करण्यासाठी आला. त्यावेळी न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मदतीने न्यायाधीशांनीच त्याला रंगेहाथ पकडले आणि भुदरगड पोलिसांच्या हवाली केले.