कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असताना गांधीनगर बाजारपेठेत मात्र आज (सोमवार) ग्राहकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली. शनिवारी व रविवारी कडक लॉकडाऊनचा फज्जा उडाला होता. तशीच पुनरावृत्ती सोमवारी दिसून आली.

एकीकडे राज्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत; पण कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णांची व मृतांची संख्या वाढत आहे. याबाबत जनतेने सजग राहून कोरोना महामारीशी लढा देणे गरजेचे होते. पण तसे न होता गांधीनगर बाजारपेठेत गर्दी वाढल्याने संसर्गही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गर्दीत सामाजिक अंतराचे कोणालाही भान राहिले नसल्याचे दिसून येत होते. ग्राहक दुकानांमधून खरेदी करून गुपचूप हळूहळू बाहेर पडताना दिसत होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दंडात्मक कारवाई सुरू आहे. पोलिसांनी गर्दी हटवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. पण मोठ्या गर्दीपुढे ते असफल ठरत असल्याचे दिसून येत होते. छत्री व रेनकोटचे नाव पुढे करून बाजारपेठेत अन्य उत्पादनाची विक्री चोरीछुपे सुरू राहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत खंत व्यक्त करून यापुढेही जिल्ह्यात निर्बंध कायम राहतील असे स्पष्ट केले असतानाही बाजारपेठेत गर्दी वाढत राहते, ही गंभीर बाब आहे. कोरोना महामारीला ती निमंत्रण देणारी ठरेल. याबाबत संबंधित प्रशासनातील घटकांनी काटेकोर अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त ठरते व तशी मागणी जाणकारामधून होत आहे.

महापूर, जीएसटी, कोरोना महामारी यामुळे बाजारपेठेची अर्थव्यवस्थाच कोलमडली. व्यापारी आर्थिक अरिष्टात सापडले, तर कामगार वेतनापासून वंचित राहिले. शासनाने व्यापारी व कामगारांना आर्थिक विवंचनेतून वाचवण्यासाठी पॅकेज देणे गरजेचे आहे. तशी मागणीही बाजारपेठेतून जोर धरू लागली आहे.