गडहिंग्लज (प्रतिनिधी) : तालुक्यातील ४४ ग्रामपंचायती व ६ बिनविरोध अशा एकूण ५० ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असून १८ तारखेला मतमोजणीची प्रक्रिया देखील सुरळीत व शांततेत पार पडली.  दरम्यान, आज (बुधवार)  नगरपालिकेतील शाहू सभागृहात प्रांताधिकारी विजया पांगारकर व तहसीलदार दिनेश पारगे यांच्या उपस्थितीत सरपंच आरक्षण सोडत होत आहे. याची  उत्सुकता सर्वांना लागली असून अनेकजण आपल्यासारखे आरक्षण पडण्यासाठी देव पाण्यात खालून बसले आहेत.

यावेळी प्रथमच सरपंच आरक्षण हे निवडणुकीनंतर घेण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतल्याने मोठा संभ्रम या निवडणुकीत पाहायला मिळाला. दर निवडणुकीत सरपंचपदावर डोळा ठेवूनच निवडणुका लढवण्यात येत होत्या. अनेक ठिकाणी काटाजोड लढती झाल्याने इथे सरपंच पदाची मोठी चुरस वाढली आहे. तर काटावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांचा भाव वधारणार असून गावातील पॅनल प्रमुखांना सदस्यांची मनधरणी करावी लागणार आहे. एकंदरीत आरक्षण कसे पडे ?  यावरच पुढची राजकीय समीकरणे तयार होणार आहेत.