अकलूज (प्रतिनिधी) : येथे आलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मंगळवारी सहभागी झाले. त्यांनी पांडुरंगाच्या नामाचा जयघोष केला. ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात त्यांनीही या भक्तिरसाचा आनंद लुटला.

पांडुरंगाची आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्तीपर्वाचे चालते-बोलते रूप असते इथे सगळे भेद गळून पडतात. या वारीत सहभागी होण्याचा आणि इथल्या भक्तीनादात दंगण्याचा मोह साऱ्यांनाच होतो.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या दिंडीने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे. अकलूज येथे दिंडीत नाना पटोले या सोहळ्यात सहभागी झाले. पटोले वारकऱ्यांच्या वेशात आले. डोक्यावर पांढरीशुभ्र टोपी, कपाळावर अष्टगंध आणि बुक्का लावून गळ्यात टाळ घातला होता. वारकऱ्यांनी सुरू अभंग सुरू करताच पटोलेंची पावले यावेळी थिरकली.