इचलकरंजी (प्रतिनिधी) : दत्तवाड आणि परिसरात बिबट्या नसून रानमांजर  आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. सर्वांनी आपली काळजी घ्यावी,  असे आवाहन वनविभागाचे डॉक्टर संतोष वाळवेकर  यांनी केले आहे. यासंदर्भात  त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे.

डॉ. संतोष वाळवेकर यांनी वन विभागाची टीम आणि दत्तवाड परिसरातील रेस्क्यू फोर्सची टीम घेऊन  बिबट्या सदृष्य प्राणी आढळलेल्या सर्व परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समितीच्या माजी सभापती आणि विद्यमान सदस्या मिनाज जमादार उपस्थित होत्या.

यावेळी बराच वेळ पाहणी केल्यानंतर असा निष्कर्ष काढण्यात आला की,  रोपवाटिका जवळ आढळलेला प्राणी हा रान मांजर आहे. तसेच बिबट्या सदृश्य प्राण्यांची हालचाल टिपण्या करिता रात्री उशिरापर्यंत कॅमेरा बसविण्यात आला. जवळजवळ संध्याकाळी पाच वाजता सुरू झालेली मोहीम रात्री आठ वाजेपर्यंत चालू होती.

यावेळी दत्तवाड गावचे पोलीस पाटील संजय पाटील, पांडुरंग साने,  जहांगीर रणमल्ली, वकील हिम्मतराव खराडे,  रेस्कू फोर्सचे निलेश तवंदकर, युनुस जमादार, अभय चौगुले आदीसह  नागरिक उपस्थित होते.