बिहारमध्ये शिवसेनेने तुतारी फुंकली, पण वाजलीच नाही

0
51

पाटणा (प्रतिनिधी) : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. हाती आलेल्या ३ वाजेपर्यंतच्या निकालानुसार शिवसेनेच्या २२ उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते पडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सत्ताधारी एनडीए विरोधात आक्रमक पवित्रा घेतलेल्या शिवसेनेला बॅकफूटवर जावे लागले आहे.    

हाती आलेल्या निकालानुसार भाजपने ७३ जागांवर आघाडी घेतली आहे. तर राजद ६८ जागांवर आघाडी घेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु भाजपचा मित्रपक्ष असलेला जेडीयू ४९ जागा घेत तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. तर काँग्रेसला अवघ्या २० जागांवर आघाडी मिळाल्याचे सध्याचे चित्र आहे.

दरम्यान, या निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेनेही आपले उमेदवार उभे केले होते. पहिल्यांदा ५० उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात शिवसेनेने २२ जागांवरच आपले उमेदवार उभे केले होते. परंतु या उमेदवारांना नोटापेक्षा ही कमी मतदान झाल्याचे निकालातून समोर आले आहे. त्यामुळे तुतारी चिन्हांवर निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेची तुतारी वाजलीच नसल्याचे स्पष्ट होत आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाला जेडीयूने आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला विनंतीनुसार तुतारी चिन्ह दिले होते. दरम्यान, मतमोजणीला अधिक वेळ लागणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.