आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यातील भादवण येथील गुंडू कदम यांच्या वडिलोपार्जित असणाऱ्या जमिनीच्या व घराच्या वाटणीवरून २७ वर्षे न्यायालयात वाद-विवाद सुरू होते. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अनेक वर्षे गेल्याने व तंटामुक्त समितीने हा वाद संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. २७  वर्षे असणारा हा वाद संपुष्टात आणण्यासाठी तंटामुक्त समितीला यश आले.

गावातील तंटा गावात मिटावा यासाठी महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान सुरु झाले. काही ठिकाणी कमिट्या अस्तित्वात आहेत. काही ठिकाणी कागदोपत्रीच आहे. आजरा तालुक्यातील भादवणच्या तंटा मुक्तीने आदर्श घालून दिला आहे.

भादवणचे तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी कुंभार, सरपंच संजय पाटील यांच्या प्रयत्नामुळे नव्वद गुंठे शेतीचा व राहत्या घराचा प्रश्न निकालात निघाला. दशरथ गुंडू कदम, कृष्णा गुंडू कदम, सदाशिव गुंडू कदम यांच्यातील हा वाद आजरा न्यायालय, जिल्हा न्यायालय, तसेच मुंबई उच्च न्यायालयापर्यंत गेला. या वादामध्ये लाखो रुपये खर्ची पडले तरी पण वाद मिटला नव्हता. अखेर हा वाद मिटवण्याचा निर्णय तंटा मुक्ती समितीने घेतला

सरपंच संजय पाटील व तंटामुक्ती समितीने तिन्ही भावांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. सर्व प्रथम भावांकडून पत्र तयार करून घेतले. तिन्ही भावांनी सहमती दिली. त्यानंतर तंटामुक्तीने तीन वेळा बैठका घेऊन मार्ग काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जमीन व घराची वाटणी करण्यात आली. जागेवर जाऊन मोजदाद करण्यात आले. प्रत्येकाला हिस्स्यांची वाटणी करण्यात आली.

गेली २७ वर्षे तुटलेली मने एकत्र आणण्यात तंटामुक्त समितीला यश आले. तिन्ही भावांनी साखर वाटून आनंद व्यक्त केला. टी. ए. पाटील, संभाजी कांबळे, प्रमोद घाटगे, महादेव शिवगंड, जितू  पाटील, पी. के. केसरकर, गीता कुंभार, दशरथ डोंगरे आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.