अवंतीपोरामध्ये जैशचा कमांडर शाम सोफीला कंठस्नान…

0
5

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  जम्मू -काश्मीरमध्ये, सुरक्षा दलांना आज (बुधवार) एका मोठ्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात मोठे यश मिळाले आहे. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोराच्या त्रालमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने जैशचा कमांडर शाम सोफीला ठार केले. याला आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी दुजोरा दिला आहे.

काश्मीरचे आयजीपी विजय कुमार म्हणाले,  दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोराच्या त्राल भागातील तिलवानी मोहल्ला वगगडमध्ये दहशतवाद्यांची माहिती मिळाली होती. सुरक्षा दलांनी तेथे घेराव घातला आणि शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले आणि चकमक सुरू झाली. या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख दहशतवादी कमांडर शाम सोफी ठार झाला आहे. आता बाकी दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.