आजरा तालुक्यात ग्रा. पं. सदस्य पदाचा जाहीर लिलाव….

0
1995

आजरा (सुभाष पाटील) :  जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. गावागावात या निवडणुकीसाठी टोकाची ईर्षा पहावयास मिळत आहे. प्रत्येकजण उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेऊन बसले आहेत. आत्ता नाही तर कधीच नाही, यासाठी गावागावात भाऊबंदकी उफाळून येत आहे. मात्र, गावांनी एकत्र येऊन ठरविले तर काय होऊ शकते याचा प्रत्यय आजरा तालुक्यातील गवसे या गावी आला आहे.

गवसे गाव लोकसंख्येने मोठे नसले तरी आजरा साखर कारखान्यांमुळे या गावाची ओळख राज्यभर आहे. प्रत्येक निवडणुकीत येथे टोकाची इर्षा पहावयास मिळते. मात्र, येथील ग्रामदैवत रवळनाथ देवाच्या मंदिराचे काम गेली १०वर्षे निधीअभावी रखडले आहे. गावकऱ्यांनी प्रथम पाहिले ते मंदिर मग निवडणूक, असा फंडा राबवला. आणि चक्क गावसभा बोलऊन उमेदवारीचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये इच्छुक उमेदवारांनी आपल्या रकमेची बोलणी करण्यासाठी सांगितले. या बोलीत सर्वसाधारण जागेसाठी १ लाख ६० हजारांची बोली लागली. तर आणखी येथील प्रभागात याच जागेसाठी १ लाख ५५ हजारांची बोलणी लागली.

तर महिला जागेसाठी तब्बल१ लाख ९० हजारांची बोलणी झाली आहे. याचे कारण म्हणजे यावर्षी महिला सरपंच आरक्षण येईल याचा अंदाज ठेऊन ही अंतिम बोलणी झाली आहे. सहापैकी पाच जागांसाठी लिलाव बोली आणि एका आरक्षित जागेसाठी स्वइच्छेने रक्कम देण्याचे ठरले आहे. तसेच ग्रुप ग्रामपंचायत म्हणून आल्याचीवाडी साठी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले आहे. तसेच निवडणुकीचे अर्ज सर्व गावांनी एकत्रीत येऊन भरण्याचे ठरले आहे. या लिलाव बोलीत ८ लाख ५५ हजार रुपये जमा झाले असून लिलाव बोलीची रक्कम देवाच्या चौथऱ्यावर ठेऊन अर्ज भरण्यासाठी जायचं आहे.

याशिवाय कोणीही अर्ज भरणार नाही, अशी शपथ देखील घेतल्याचे बोलले जात आहे. ज्याला पदाची अपेक्षा आहे त्यांनी लिलाव बोलवा, असेच ठरल्याने व गावच्या मंदिराचा भावनिक प्रश्न असल्याने निवडणूक बिनविरोध होणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. गवसे गावाने निवडणूकीत अजब फंडा राबविल्याने तालुक्यात याची चर्चा होताना दिसत आहे.