मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा अध्यक्षपदी निवड होताच राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची नियुक्ती रद्द केली. यावर ‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’, अशी टीका करून संजय राऊत यांनी लोकशाहीत मालक बदलले की निर्णय बदलतात; मात्र आमची कायदेशील लढाई सुरु राहील, असे सांगितले.

विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या गटनेत्यांचे पद रद्द करुन त्या जागी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. हा राजकीय चढाओढीचा भाग आहे. विधानसभा असो की राज्यसभा, लोकसभा या सर्वांमध्ये पीठासीन अधिकारी हा सत्ताधारी पक्षाचा माणूस असतो. हे अधिकारी त्या-त्या पक्षाच्या सोयीचेच निर्णय घेत असतात. संसदीय लोकशाहीत वेळेनुसार मालक बदलत जातो आणि निर्णय होतात, असे संजय राऊत म्हणाले.

बंडखोर शिवसेनेतून फुटून बाहेर गेले. या आमदारांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने शर्थ केली. आता फुटून तुमच्याकडे बहुमत असले तरी मूळ पक्ष तुमचा कसा असेल, हे तुमच्याच मनाला विचारुन पाहा, असे बंडखोरांना राऊत म्हणाले. हाच प्रश्न विधानसभेचे अध्यक्ष व विधिमंडळ सचिवालयालाही पडला पाहिजे, असा टोलाही राऊत यांनी लगावला. शिवसेना फक्त विधिमंडळात कुमकुवत झाली आहे. तालुका, गावांमध्ये अजूनही शिवसेना भक्कम आहे. केवळ काही लोक सोडून गेले म्हणून शिवसेना कमकुवत होणे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे, असे राऊत म्हणाले.