…तर २०२४ च्या निवडणुकीत भाजप ४०० चा आकडा क्रॉस करेल : चंद्रकांत पाटील   

0
110

कणकवली (प्रतिनिधी) : मागील सहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय पाहता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप ४०० चा आकडा सहज क्रॉस करील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (गुरूवार) येथे व्यक्त केला. कणकवलीमध्ये भाजपच्या वतीने कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.

पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांचे समर्थन संपूर्ण देशाने केले आहे. कायदे सहा महिन्यांपूर्वी कऱण्यात आले आहेत. मात्र, विरोधकांना आता जाग आली आहे. राज्यातील मूठभर लोकांच्या साथीने देशाला आणि नागरिकांना वेठीस धरून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर विकण्याचा कायदा काँग्रेसने तीन वेळा करण्याचा प्रयत्न केला होता. आता शेतकऱ्यांना फसवले जात असल्याचा आरोप ते करत आहेत, असे म्हणत शेतकऱ्यांना वेडे समजता का?, असा सवालही  पाटील यांनी विरोधकांना केला. पंतप्रधान मोदींनी शेतकरी हिताचे कायदे केल्याने विरोधकांकडून त्यास विरोध सुरू केला आहे, असेही पाटील म्हणाले.