‘जीएसटी’मध्ये सुधारणा करा इचलकरंजीतील व्यापाऱ्यांची मागणी…

0
58

इचलकरंजी (प्रतिनिधी) : केंद्र शासनाने देशभरात अंमलात आणलेली जीएसटी करप्रणाली ही अतिशय किचकट आणि गुंतागुंतीची आहे. तरी त्यामध्ये सुधारणा करुन व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी  आज (शुक्रवार) इचलकरंजी शहरातील किरकोळ किराणा आणि भुसारी व्यापारी असोसिएशनच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाने जीएसटी करप्रणालीची घोषणा करुन त्याची देशभरात प्रभावी अंमलबजावणी सुरु केली आहे. पण, गेल्या चार वर्षांच्या कालावधीत यामध्ये वेळोवेळी बदल केला आहे. परिणामी, ही करप्रणाली अधिक किचकट आणि गुंतागुंतीची होवून याचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे. याशिवाय जीएसटी करप्रणालीमध्ये काही चूक झाल्यास संबंधित व्यापा-यांना शिक्षेची तरतूद देखील कायद्यात करण्यात आली आहे. तरी जीएसटी करप्रणालीत असणारी अतिशय किचकट व गुंतागुंतीची प्रक्रिया कमी करुन त्यामध्ये सुधारणा करावी.जेणेकरुन व्यापाऱ्यांना जीएसटी कर भरणे सोपे होणार असल्याचे म्हटले आहे.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष महावीर शिरगुप्पे, उपाध्यक्ष संतोष पाटील, सचिव जितेश हुक्केरी, खजिनदार सुभाष तनंगे, संजय वठारे, माणिक जंगटे, उत्तम डोणे, शशिकांत खोत, मोहन भोसले, चंद्रकांत कसलकर आदी उपस्थित होते.