हैद्राबाद (वृत्तसंस्था) : आपण कोणत्याही परिस्थितीत राजकारणात परतणार नसल्याचे स्पष्टीकरण ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी दिले आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर रजनीकांत यांनी आपण राजकारणात येणार ही अफवा असल्याचा खुलासा केला आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांचा मनोरंजन सृष्टीत जितका दबदबा आहे, तितकेच ते राजकारणातही काही महिन्यांपर्यंत सक्रिय होते. २०१७ मध्ये त्यांनी राजकारणात पाऊल टाकत असल्याची घोषणा केली होती. साडेतीन वर्ष राजकारणात सक्रिय राहिल्यावर जुलै २०२१ मध्ये त्यांनी राजकारणाला रामराम केला. त्यानंतर ते पूर्णपणे चित्रपटसृष्टीत कार्यरत झाले आहेत.

पुन्हा एकदा रजनीकांत राजकारणाकडे वळणार असल्याची चर्चा रंगली आहे. या मागचे कारण म्हणजे तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी नुकतीच तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी यांची राजभवनात भेट घेतली. दोघांची ही बैठक सुमारे अर्धा तास चालली होती. या भेटीनंतर रजनीकांत पुन्हा एकदा राजकारणात येतील, अशी चर्चा होत आहे. विशेष म्हणजे राज्यपालांच्या भेटीनंतर त्यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. यावेळी रजनीकांत यांना राजकारणात परत सक्रिय होणार का, असा प्रश्न विचारला असता. त्यावर उत्तर देताना ते ‘नाही’ असे म्हणाले.