दिल्ली दौऱ्याआधी उद्धव ठाकरे-शरद पवारांमध्ये महत्त्वाची बैठक

0
90

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दिल्लीला रवाना होणार आहेत. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांची आज (शुक्रवार) दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होत असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेले भ्रष्ट्राचाराचे आरोप, महाविकास आघाडी नेत्यांच्या पाठीमागे लागलेला ईडीचा ससेमिरा आणि मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यातील बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या राष्ट्रीय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यासोबतच इतरही राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, सह्याद्रीवर अतिथीगृहावर राज्यातील शाळांमध्ये डिजिटल शिक्षण देण्यासंदर्भात सादरीकरण होत आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित आहेत.