नॉन कोविड रुग्णासंबंधी आरोग्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना

0
69

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना संसर्गाचा शिरकाव झाल्यापासून सर्व आरोग्य यंत्रणा या महामारीशी लढत आहे. परिणामी नॉन कोविड रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे. आता कोरोना नियंत्रणात आला असून जिल्हा आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णसेवेकडे लक्ष द्यावे, अशा सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या. आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

ते म्हणाले, या वर्षात नागरिकांसह आरोग्य यंत्रणा कोरोनाशी यशस्वी लढा देत आहे. कोरोना नियंत्रणात असला तरी खबरदारी घेणे आवश्यक आहे. नवीन वर्ष सर्वांना आरोग्यदायी आणि कोरोनामुक्त जावो. आरोग्य विभागातील पदभरतीला गती मिळावी यासाठी आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, मागासवर्ग कक्षाचे अधिकारी, आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. अनेक दिवसांपासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत त्या तातडीने कराव्यात. मोबाईल सर्जिकल युनिट सुरु करावे. आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती सामान्यांना व्हावी यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि गावातील मुख्य चौकात माहितीचे मोठे फलक लावण्यात यावेत. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा प्रभावीपणे प्रचार आणि प्रसिद्धी करावी. त्याचबरोबर या योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यात एक रुग्णालय सहभागी होईल यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी प्रयत्न करावे.