पूजाच्या आजाराबाबत आई-वडिलांनी दिली महत्त्वाची माहिती   

0
88

पुणे (प्रतिनिधी) : पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी अरूण राठोड याला आज ताब्यात घेतले आहे. त्याआधी पूजाच्या आई-वडिलांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. त्यामधून काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पूजाला सोरायसीस नावाचा आजार होता. त्याबाबत तिच्यावर उपचारही सुरू होते. त्या गोळ्यांमुळे तिला चक्कर आली असल्याची शक्यता तिच्या आई-वडिलांनी वर्तवली आहे. 

याबाबतचा अहवाल पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर होईल. या अहवालात अरुण राठोडचा महत्वाचा भाग आहे. अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे. यवतमाळ प्रकरणातही अरुण राठोड नामक व्यक्ती असल्याने संशय बळावला आहे. या अहवालात विजय चव्हाणही सोबत असल्याचा उल्लेख आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे.    यात शिवसेनेचे नेते व वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. या प्रकरणातील काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यामध्ये कथित मंत्री आणि अरुण राठोड यांच्यातील संवाद आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून आकस्मिक मृत्यूचीच नोंद करण्यात आली आहे.