कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या शाळांची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. एकूण ५८ शाळांमध्ये फक्त १०  हजार ९२३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेची पटसंख्या खालावत चालली आहे.  तरी महापालिका शाळांचा दर्जा सुधारून विविध उपक्रम सुरू करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या  शिष्टमंडळाने शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शाळांची डागडुजी करण्यासाठी महापालिकेला निर्देश द्यावेत. विद्यार्थ्यांसाठी खेळणी, गोष्टींची पुस्तके व वाचन साहित्य पुरविण्यात यावे. पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने, टप्प्या-टप्याने या शाळांमध्ये सेमी-इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यात यावे.  महापालिका शाळांमध्ये एक परदेशी भाषा शिकवण्यात यावी. महापालिकेच्या शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची पदे त्वरित भरण्यात यावीत. तसेच मुलांमध्ये संगीत,  गायन, मर्दनी खेळ या सारख्या गोष्टींमध्ये विशेष प्राविण्य मिळवण्यासाठी स्पेशल कोच नेमावेत. शिक्षणाधिकारी पद कायमस्वरूपी भरण्यात यावे. महापालिकेच्या शाळांची देखभाल करण्यासाठी प्रत्येक शाळेवर एक इस्टेट ऑफिसर नेमण्यात यावा. महापालिकेच्या शाळेत आनंददायी अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा. तरी या सूचनांची तसेच मागण्यांची त्वरित दखल घेऊन कार्यवाही करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी कोल्हापूर महापालिका प्रचार समिती अध्यक्ष संदिप देसाई, शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, संघटक सुरज सुर्वे, महिला शहर अध्यक्ष अमरजा पाटील, विभाग प्रमुख विशाल वठारे, विभाग प्रमुख बसवराज हादिमनी आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.