कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावर उद्योजकांच्या जाहिरातीचे फलक झळकविल्याने कोल्हापूर शहरवासियांमध्ये संतापाची लाट उसळली होती. शिवसेनेने याची तत्काळ दखल घेऊन या प्रवेशद्वारावर रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाचा फलक लावला होता. प्रवेशद्वाराची जागा ताब्यात घेवून तातडीने या प्रवेशद्वाराचे सुशोभिकरण व नामकरण करावे, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज (सोमवार) महापालिका प्रशासनास लेखी पत्राद्वारे दिल्या आहेत.

या पत्रात म्हटले आहे की, प्रवेशद्वार परिसरात रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे, गवत, रस्त्याला पडलेल्या भेगा, सिमेंट रस्ता खुदाई करून त्या जागी केलेल्या डांबरीकरणामुळे पडलेले खड्डे, परिसरातील अतिक्रमण, महामार्गामुळे होणारी वाहतुकीची कोंडी, प्रवेशद्वार परिसरात न होणारी स्वच्छता आदी बाबी नित्याच्याच बनल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी एका उद्योजकाच्या नावाचा फलक या कमानीवर झळकल्याने संपूर्ण शहरवासियांमधून संताप व्यक्त करण्यात आला होता. कमानीची जागा भाडेतत्वावर एका जाहिरात कंपनीस दिली असल्याचे समजते. कोल्हापूरच्या अस्मितेवर एखाद्या जाहिरात कंपनीचा ताबा असणे आणि प्रवेशद्वारावर उद्योजकांच्या जाहिराती लावणे, ही बाब कोल्हापूरवासीय कदापी सहन करणार नाहीत. त्यामुळे कोल्हापूर शहराचे प्रवेशद्वारची जागा तत्काळ महापालिकेच्या ताब्यात घेवून सुशोभिकरण करून यास राजर्षी छत्रपती शाहू महाराज, असे नामकरण करून करवीरनगरीमध्ये सहर्ष स्वागत अशा आशयाचा फलक लावण्यात यावा, अशा सूचना क्षीरसागर यांनी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांना दिल्या आहेत.