साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यात दारू, जुगार आणि मटक्यासारखे अवैध व्यवसाय फोफावले आहेत. तालुक्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्र असलेल्या तिसंगी, शेनवडे, असळज आणि गगनबावडा या ठिकाणांसह मुख्य बाजारपेठ असणारी निवडे, साळवण, असळज, गगनबावडा येथे राजरोसपणे खुलेआम मटका, जुगार आणि मद्याची विक्री केली जाते. हे अवैध व्यवसाय तात्काळ बंद करावेत, अशी मागणी गगनबावडा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी पोलीस निरीक्षक रणजित पाटील आणि गगनबावडा तहसीलदार संगमेश कोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांमध्ये दारुमुळे अनेक जणांचा जीव गेल्यामुळे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मटका सुरू झाल्यामुळे विद्यार्थीही त्या मार्गाला जाताना दिसत आहेत. येथील गावकामगार पोलीस पाटील ही आपली जबाबदारी झटकत आहेत. तसेच रस्त्याशेजारी असणाऱ्या पानपट्टीच्या टपऱ्या आणि चहा गाड्यांवरही खुलेआम दारूची विक्री केली जात आहे.

तसेच या व्यवसायात असणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन तालुक्यातील अवैध व्यवसाय तात्काळ बंद करावेत. अन्यथा एक सप्टेंबरपासून रास्ता रोको, उपोषण, मोर्चे अशा मार्गांचा अवलंब राष्ट्रवादीच्या वतीने करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी युवक तालुकाध्यक्ष दिलीप पाटील,  उपाध्यक्ष भिवाजी वरेकर, विवेक सनगर, मोहन पडवळ, प्रदीप डाकवे, शब्बीर नायरे, अनिल लटके, सखाराम कांबळे आदी उपस्थित होते.