कोल्हापूर (प्रतिनिधी) : रेशनचे धान्य बेकायदेशीरपणे खरेदी केल्याप्रकरणी कसबा बावडा येथील दोघांविरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कसबा बावडा येथील पाटील गल्लीतील एका इमारतीमध्ये संदीप सीताराम रणदिवे व राजू सीताराम रणदिवे या दोघांनी काही लाभार्थ्यांकडून रेशनचे धान्य बेकायदेशीरपणे खरेदी करून एकूण १ हजार २८२ किलो तांदूळ व १ हजार ९९८ किलो गहू एवढे धान्य जमा केल्याचे दिसून आले. या बेकायदेशीर कृत्याबद्दल दोघांविरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

शासकीय अनुदानित अन्नधान्याची लाभार्थ्यांकडून बेकायदेशीर खरेदी-विक्री केल्याचे आढळल्यास संबंधितांविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिला आहे. अशा प्रकारे कोणत्याही लाभार्थ्यांनी त्यांना मिळालेले शासकीय धान्य कोणालाही बेकायदेशीरपणे विक्री करु नये अथवा कोणीही ते खरेदी करू नये. लाभार्थ्यांना धान्याची आवश्यकता नसल्यास त्यांनी हा लाभ सोडून देण्याबाबत अर्ज सादर करावा, असेही पुरवठा अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.