कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील कपिलतीर्थ परिसरात स्वच्छतागृहास बेकायदेशीर नळजोडणी दिल्याने संतप्त नागरिकांनी आज (गुरुवार) दुपारी महापालिकेचे जल अभियंता नारायण भोसले यांना सुमारे एक तास घेराव घेतला. याबाबत जाब विचारत धारेवर धरले. यानंतर बेकायदा नळ जोडणी तातडीने तोडून टाकण्यात आली. भोसले यांनी याप्रकरणी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले.

कोल्हापुरात ताराबाई रोड परिसर, कपिलतीर्थ, वांगी बोळ,  दातार बोळ, तोफखाने बोळ, पोतनीस बोळ, गुरुमहाराज वाडा परिसर या भागांमध्ये सातत्याने कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. याबाबत वारंवार प्रशासनाचा पाठपुरावा करूनही या प्रश्नाची निर्गत होत नाही. अशातच काल (बुधवार) रात्री बेकायदेशीरपणे कपिलतीर्थातील स्वच्छतागृहात नळजोडणी देण्याचे काम करून घेतले गेले. याची माहिती मिळताच माजी नगरसेवक अजित ठाणेकर, भाजपा सरचिटणीस हेमंत आराध्ये, अशोक देसाई यांच्या नेतृत्वाखाली नागरीक मोठ्या संख्येने कपिलतीर्थात जमा झाले

तिथे जल अभियंता नारायण भोसले यांना बोलावण्यात आले. त्यांच्यावर संतप्त नागरिक व महिलांनी त्यांना घेराव घालून प्रश्नांचा भडिमार केला. नागरिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे भोसले यांनी तातडीने महानगरपालिकेचे कामगार बोलावून हे कनेक्शन तोडून टाकले. तसेच याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासनही दिले.

यावेळी भाजपा शिवाजी पेठ मंडल अध्यक्ष प्रदीप पंडे, सौ. नीलम जाधव, सौ. अनुराधा गोसावी, सौ. दीपा ठाणेकर, सौ. दीपाली शेटे, मंगल गुरव, ऊर्मिला ठाणेकर,  अनिश पोतदार, संतोष जोशी, संतोष कदम आदी उपस्थित होते.