गडहिंग्लज (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यातील तुडये येथे म्हाळुंगे रोडवर अवैधरित्या गोवा बनावटीचा मद्यासाठा वाहतूक करताना येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक टेम्पो पकडला. त्यामध्ये विविध विदेशी ब्रँडच्या ७५० मिली बाटल्यांचे पाच बॉक्स आढळून आले. याप्रकरणी विनोद कल्लाप्पा पाटील (वय २९) आणि राजेश खाचाप्पा कांबळे (वय २१, दोघेही रा. तुडये ता. चंदगड) या दोघांना पथकाने ताब्यात घेतले आहे. टेम्पोसह ३ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने म्हाळुंगे रोडवर तुडये येथे आज (शुक्रवार) सकाळी तपासणी सुरू केली होती. या वेळी गोव्याकडून येणारा पांढऱ्या रंगाचा टेम्पो (क्रमांक के. ए २२ बी ३८१९) अडविला असता त्यामध्ये ५ बॉक्स मद्यसाठा आढळून आला.

या कारवाईमध्ये निरीक्षक एम. एस. गरुड, दुय्यम निरीक्षक ए. बी. वाघमारे, जी. एन. गुरव आदींसह अन्य पथकाचा समावेश होता.