कोतोली (प्रतिनिधी) : कोलोली येथील श्री गाडाईदेवीच्या यात्रेत मोठ्या प्रमाणावर लेसर शोसह डॉल्बीचा दणदणाट झाला. रात्री ११ नंतरही डॉल्बी वाजत राहिला तरी त्याकडे पन्हाळा पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावची श्री गाडाईदेवीची देव दिवाळीनिमित्त यात्रा उत्साहात झाली. तीन वर्षे कोरोनामुळे यात्रा झाली नव्हती; पण यंदा यात्रा मोठ्या प्रमाणात यात्रा झाली.

गाडाईदेवीच्या यात्रेनिमित्त गावामध्ये बैलांचे गाडे काढण्यात आले. त्याच दरम्यान तरुणांनी डॉल्बीच्या तालावर ठेका धरला होता. पोलिसांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे रात्री दहानंतर आवाजावर घातलेल्या बंधनाचे पालन करण्यात आले नाही. नियम धाब्यावर बसवून आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाले आहे.

संपूर्ण गाव यात्रेमध्ये सहभागी होते. पोलिसांनी मात्र काल मर्यादेनंतरही डॉल्बीला अटकाव केला नाही. यात्रेवेळी तरुणांनी डॉल्बीच्या तालावर जोरात ठेका धरला होता. आचारसंहितेचे उल्लंघन करून रात्री ११ वाजेपर्यंत डॉल्बी वाजत राहिला होता. पन्हाळा पोलीस कर्मचारी याच डॉल्बी लावणाऱ्या तरुणांच्या खांद्यावर हात टाकून फिरत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. उशिरापर्यत चालू राहिलेल्या मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडीही झाली होती. पोलिसांनी मात्र याकडे कानाडोळा केला होता. यामुळे निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेच्या नियमाला वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांतून व्यक्त करण्यात आली.